(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील साडवली (सह्याद्रीनगर) येथे रस्त्यातील खड्ड्यामुळे दुचाकीचा वेग कमी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना घडली. या प्रकरणात भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाच्या कपाळावर दुचाकीच्या बॅटरीने प्रहार करून त्याला जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप असून, या प्रकरणी देवरूख पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ४) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सह्याद्रीनगर परिसरातील गद्रे यांच्या कंपाउंडजवळील कच्च्या रस्त्यावर हा प्रकार घडला. मनिष दीपक बांडागळे (वय २६) हे आईला सोडण्यासाठी भावाच्या दुचाकीवरून जात असताना रस्त्यातील मोठ्या खड्ड्यामुळे त्यांनी वाहनाचा वेग कमी केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारासोबत त्यांचा वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वाद सुरू असल्याचे पाहून मनिष यांचा भाऊ दिनेश दीपक बांडागळे (वय ३१) मध्यस्थी करण्यासाठी घटनास्थळी आला. त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीने दुचाकीच्या बॅटरीने दिनेश यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात दिनेश जखमी झाले.
फिर्यादीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, घटनेदरम्यान एका महिलेने फिर्यादी, त्यांच्या आईला शिवीगाळ करत गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मनिष बांडागळे यांच्या फिर्यादीवरून देवरूख पोलीस ठाण्यात अनिकेत आत्माराम झगडे, धर्मेंद्र तानाजी भोपळकर आणि प्रियंका प्रकाश भोपळकर (सर्व रा. सह्याद्रीनगर, साडवली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३२४(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरूख पोलीस करीत आहेत.

