( मुंबई / वृत्तसंस्था )
विक्रोळी पश्चिमेकडील पार्कसाईट परिसरातील राहुल नगर येथे गुरुवारी (६ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले. घरात मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या वादानंतर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत वडील आणि त्यांच्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, तर पत्नी आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने विक्रोळी परिसरात खळबळ उडाली आहे.
गाणी लावण्यावरून वादाला सुरुवात
पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल नगर येथे विश्वकर्मा कुटुंबातील चार भाऊ एकाच इमारतीत वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील विश्वकर्मा (४०) यांनी पहाटेच्या सुमारास घरात मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यावर त्यांचे भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी आक्षेप घेतला. त्यातून भावांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच वाद वाढत जाऊन हाणामारी झाली.
धारदार शस्त्राने कुटुंबावर हल्ला
वाद विकोपाला गेल्यानंतर सुरेंद्र आणि सूरज यांनी सुनील विश्वकर्मा यांच्या कुटुंबावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा गंभीर जखमी झाले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात सुनील यांचा १४ वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा देखील गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, उपचारापूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू झाला.
पत्नी आणि लहान मुलगा गंभीर जखमी
हल्ल्यात सुनील विश्वकर्मा यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि त्यांचा लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण, घटनेचा क्रम आणि आरोपींची भूमिका याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
क्षुल्लक वादाचे भीषण हत्याकांडात रूपांतर
मोठ्या आवाजात गाणी लावण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचा शेवट दोन जणांच्या मृत्यूत आणि दोघांच्या गंभीर जखमी होण्यात झाला. या घटनेमुळे कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय आला आहे.

