(मुंबई)
मुंबईतील बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. रविवारी रात्री उशिरा बेस्ट कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांवर सरकारकडून मोठे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची हंगामी वाढ तर कंत्राटी (वेट लीज) कर्मचाऱ्यांना 2,000 रुपयांची वाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
प्रलंबित रक्कम आणि वेतन करारावर निर्णय
नवीन वेतन करार होईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तसेच प्रलंबित ग्रॅच्युइटीची रक्कम चालू आर्थिक वर्षात अदा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. बेस्ट उपक्रमाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढील तीन वर्षांत 5,000 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सेवेत सुधारणा होईल आणि आर्थिक तोटा कमी करण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. या संदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली असून बेस्टच्या आर्थिक पुनर्रचनेसाठी सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे.
15 दिवसांत पुन्हा बैठक
इतर प्रलंबित मुद्द्यांवर पुढील 15 दिवसांत पुन्हा बैठक घेण्यात येणार असून सर्व विषयांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, बेस्ट कर्मचारी आणि प्रवासी दोघांच्याही हिताचा विचार करून हे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून बेस्टची सेवा पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

