(नाशिक)
शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली असून, त्यामुळे कोकाटेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात त्यांना दोन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कोट्यातून देण्यात येणाऱ्या अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे गैरव्यवहार केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यावर आहे. या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी निकाल देताना प्रथम वर्ग न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत कोकाटे यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्र्यांवरील संकट आणखी गडद झाले आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, सुमारे ३० वर्षांपूर्वी नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ‘व्ह्यू अपार्टमेंट’मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांनी मिळवल्या होत्या. मात्र, पात्रतेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर तत्कालीन राज्यमंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून या सदनिका वाटपाची चौकशी सुरू झाली.
या चौकशीनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांना दोषी ठरवले आहे. प्रथम वर्ग न्यायालयाच्या निकालानंतर विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली होती. आता जिल्हा सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवल्याने राज्याच्या राजकारणात या निकालाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

