(सातारा)
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील डॉक्टर महिलेच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या घटनेतील शवविच्छेदन अहवाल आता पोलिसांच्या हाती आला असून, त्यानुसार डॉक्टर महिलेचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा आघाताच्या खुणा आढळल्या नाहीत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पीडित महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या दोघांची नावं नमूद केली होती. आरोपी बदणे याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केला. तर प्रशांत बनकरने आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असं तिने नोटमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान, मृत महिलेच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
या तपासात पोलिसांनी मुख्य आरोपी प्रशांत बनकर आणि पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) मागवले होते. प्राप्त अहवालानुसार, डॉक्टर महिलेचा पीएसआय गोपाळ बदनेसोबत संवाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बदने हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असला तरी, त्याने आपला मोबाईल फोन अद्याप पोलिसांकडे जमा केलेला नाही, त्यामुळे तपासात काही अडथळे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बदनेने पोलिसांना दिलेल्या जबाबात तो आणि डॉक्टर महिला हे फक्त मित्र असल्याचे सांगितले आहे. मात्र, सीडीआरमधील संभाषणांचा तपशील आणि संवादाचे स्वरूप या तपासातील निर्णायक मुद्दे ठरणार आहेत.
दरम्यान, या घटनेला आता राजकीय वळणही मिळाले आहे. ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले असून, या प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचा दावा केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रकरणाचा निंबाळकरांशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या सर्व घडामोडींमुळे सातारा डॉक्टर मृत्यू प्रकरणाचे गूढ आणखी गडद होत चालले आहे. पुढील काही दिवसांत या तपासातून नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.

