(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे येथे रविवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत शास्त्री नदीत बुडून ९ वर्षीय मुलीसह तिच्या ५० वर्षीय काकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कोंड उमरे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये रमेश कांबळे (वय ५०) आणि त्यांची पुतणी स्वरा संतोष कांबळे (वय ९) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश कांबळे यांच्या घरी रविवारी ‘मिरगाची राखण’ या पारंपरिक कार्यक्रमानिमित्त त्यांचे भाऊ संतोष कांबळे हे कुटुंबासह मुंबईहून गावी आले होते. दुपारच्या सुमारास स्वरा हिने नदीवर अंघोळीसाठी जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर रमेश कांबळे तिला घेऊन गावाजवळील शास्त्री नदीतील ‘टवली डोह’ येथे गेले.
बराच वेळ उलटूनही दोघेही घरी परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान स्वराचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत नदीत शोधमोहीम राबवली. काही वेळानंतर रमेश कांबळे यांचाही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
या दुर्दैवी घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

