( धाराशिव / मुंबई )
राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला अखेर अधिकृत स्वरूप मिळाले आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका समोर आली नव्हती. आता ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःच प्रवेशाची घोषणा केल्याने ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. विरोधकांकडे राजकीय सत्ता आणि आर्थिक बळ असल्याने मर्यादित साधनसामग्रीवर किती काळ संघर्ष करायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता विकासकामांसाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सत्तेचा भाग होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसारख्या मूलभूत कामांसाठीही निधी उपलब्ध होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “दरवर्षी केवळ अंदाजपत्रके तयार होतात, पण प्रत्यक्ष कामे होत नाहीत. सत्ता विरोधकांच्या हातात असल्याने आपल्या कार्यकर्त्यांची देयकेही अडवली जात आहेत. त्यामुळे आता नेतृत्वासोबत सत्ता स्वीकारण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पवनराजे प्रकरणाचाही उल्लेख केला. “20 वर्षांनंतरही पवनराजे प्रकरणात एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही. न्यायालयाने राजकीय वैमनस्य आणि हत्येचा हेतू मान्य केला, तरी सर्व आरोपी निर्दोष सुटले. खासदार असूनही माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकलो नाही, तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार?” असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यात आपली चांगली प्रतिमा असल्याचे लोक सांगतात, मात्र केवळ प्रतिमा जपण्यासाठी आपण खासदार झालो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “ज्यांच्याविरोधात लढण्यासाठी राजकारणात आलो, त्यांच्यासमोर झुकण्यासाठी नाही, तर त्यांना थेट जाब विचारण्यासाठी मी हा निर्णय घेत आहे. कोणतीही तडजोड करणार नाही आणि त्या कुटुंबासाठी कधीही मते मागणार नाही,” असेही निंबाळकर यांनी ठामपणे सांगितले.
‘लढायचे असेल तर समोर या’ – उद्धव ठाकरे
पक्ष सोडणाऱ्या खासदारांना थांबवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून भावनिक प्रयत्न करण्यात आले होते. मात्र हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका जाहीर करताच राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
दरम्यान, मुंबईत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना फुटीर खासदारांनी पाठवलेल्या पत्रात पक्षाच्या विचारधारेबाबत आणि संभाव्य विलीनीकरणाबाबत काही दावे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “ज्यांना लढायचे आहे त्यांनी समोर येऊन लढा. मैदानात उतरल्यावर खरी ताकद कोणाची आहे ते कळेल.” त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत, “औकातीत राहा,” असा इशारा दिला आहे. ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भावनिक आवाहन केले की, “मी मतदारांची माफी मागतो. तुम्ही शिवसेनेसाठी रक्ताचे पाणी केले, पण या काही लोकांनी विश्वासघात केला,”
ओमराजे निंबाळकर यांच्यासह ‘ऑपरेशन टायगर’ने राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे दूरगामी राजकीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

