(देवरुख / सुरेश सप्रे)
रत्नागिरी–कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील दख्खन परिसरात बोलेरो चालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत २५ हजार रुपयांची लूट केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवरूख पोलिसांनी अवघ्या दोन तासांत कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) हे बोलेरो गाडीतून वेतोशी (ता. जि. रत्नागिरी) येथून सायंकाळी सुमारे ६.३० वाजता एक म्हैस घेऊन शिराळा (जि. सांगली) येथे जात होते. आंबा घाटातील दख्खन येथे आल्यानंतर त्यांच्या गाडीला पाठीमागून ‘पांडुरंग’ असे लिहिलेली थार (MH-08/2767) व ‘भारत सरकार’ स्टिकर असलेली इनोव्हा (MH-08/2099) या दोन गाड्यांमधून आलेल्या आठ जणांच्या टोळीने अडवले.
आरोपींनी गाडीसमोर व मागे वाहन लावून चालकाला खाली उतरवले. त्यानंतर मारहाण, शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवले. त्याला साखरपा येथील गद्रे पेट्रोल पंपाजवळ नेऊन अर्ध्या वाटेत सोडून दिले. यावेळी ५० हजार रुपयांची मागणी करत गाडीतील केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत फिर्यादीने साखरपा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू करण्यात आला. देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४७/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी फरहान रशीद मुल्ला (वय ४२, रा. कोकणनगर), प्रथमेश सचिन भाटकर (वय २४, रा. गोळप), सर्वेश सुभाष किर (वय २२, रा. सोमेश्वर किरबाग), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (वय २६, रा. कुवारबांव) आणि भूषण बिपेंद्र सावंत (वय २६, रा. मिर्या, भारतीय शिपयार्डजवळ) या पाच आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, शांताराम पेंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे, अमर सुतार, तसेच महिला पोलीस कर्मचारी रेश्मा चव्हाण यांचा समावेश होता.

