(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. महामार्गावरील खड्डे, खचलेले भाग, भेगाळलेले काँक्रीटचे रस्ते आणि रस्त्यालगत कोसळणाऱ्या दरडी यांनी हा महामार्ग “मृत्यूचा सापळा” बनला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी गावाकडे येण्याच्या तयारीत असताना, त्यांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पावसाळ्यात रस्त्यांची दुर्दशा नवीन नाही, पण यंदा परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. नवीन केलेल्या रस्त्यांवर मध्यभागीच मोठमोठे खड्डे पडले आहेत, जे पाणी साचल्यामुळे दिसून येत नाहीत. तर काँक्रीट रस्त्यांवर भेगा पडू लागल्या आहेत. यामुळे वाहनधारकांमध्ये संतापाची लाट असून, “हे खड्डे चाकरमान्यांच्या स्वागतासाठी खास तयार केले आहेत काय?” असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत, आणि मुर्दाड यंत्रणेला लाखोली वाहत आहेत.
ठेकेदारांचा मस्तवालपणा आणि अधिकारी सुस्त
पावसाळी अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी महामार्गावरील कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार टीका केली होता. मात्र, ठेकेदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांना याचा काहीही फरक पडलेला दिसत नाही. कोणतीही शासकीय यंत्रणा या ठेकेदारांवर वचक ठेवू शकत नाही, ही बाब अधिक चिंतेची आहे.
महामार्गावर नियमितपणे होणाऱ्या अपघातांमुळे सामान्य नागरिकांचे प्राण जात आहेत, गाड्यांचे नुकसान होत आहे, अनेक वाहनचालक जखमी होत आहेत. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे अपघातांची ही मालिका थांबण्याचे चिन्ह नाही.
सरकार एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रस्ते विकासाचे स्वप्न दाखवत आहे, तर दुसरीकडे महामार्गाच्या दयनीय अवस्थेवर डोळेझाक केली जात आहे. विकासकामांचा दर्जा फारच खालावला असून, भ्रष्टाचार आणि ठेकेदारांच्या मनमानीमुळे सरकारी निधीचा अपव्यय सुरू असल्याचे चित्र आहे.
सरकारी तिजोरीतील पैसा हा जनतेच्या करातून गोळा केलेला आहे. तो पैसा जनतेच्या हितासाठी खर्च होणे अपेक्षित असताना, सध्या “विकासाच्या नावाखाली ठेकेदार मालामाल, आणि जनतेला फक्त वावड्या” अशी अवस्था झाली आहे.
प्रशासन झोपेत, जनतेचा जीव मुठीत
महामार्गावर दररोज छोट्या मोठ्या अपघातांची नोंद होत आहे. पण या अपघातांना जबाबदार असलेली व्यवस्था सुस्त आहे. भ्रष्टाचारावर आवाज उठवणारेही सामाजिक कार्यकर्तेही आता कमालीचे शांत झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग हा देशाच्या आर्थिक आणि पर्यटन दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. पण सद्यस्थितीत हा महामार्ग ‘मृत्यूचा रस्ता’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येतो आहे, तसतसे चाकरमान्यांची प्रवासाबाबत धास्ती वाढत आहे. अपूर्ण, निकृष्ट आणि खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करत गावाकडे पोहोचणे हे चाकरमान्यांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे.
सरकारी यंत्रणांना जाग कधी येणार?
महामार्गाच्या कामाची गुणवत्ता, अपघातांचं प्रमाण, आणि ठेकेदारांची मनमानी या सगळ्या गोष्टींकडे सरकार, प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी डोळेझाक करत आहेत. हा विषय सध्या तरी ‘वाऱ्यावर सोडला’ गेला आहे. पण ही झोप अजून किती दिवस राहणार? आणि ती जाग कशामुळे आणि केव्हा येणार? की आणखी मोठ्या दुर्घटनेची सरकारी यंत्रणा वाट पाहत आहे, असे प्रश्न आता सर्वसामान्यांना पडले आहेत.