(खेड / वार्ताहर)
भारतीय जनता पार्टी, खेड आणि आयुष होमिओपॅथी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चिपळूणची आंतरराष्ट्रीय योगपटू तथा वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक विजेती तन्वी रेडीज प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. तिच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले.
कार्यक्रमात तन्वी रेडीज हिने विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करत योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना तिने सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत, दररोज किमान १२ मिनिटे योगाचा सराव करण्याचे आवाहन केले.
आपल्या यशाचा प्रवास सांगताना तन्वी म्हणाली, “दुसरीत असताना मी कथ्थक शिकण्यासाठी जात होते. मात्र, क्रीडा क्षेत्रात वेगळे काही करण्याच्या इच्छेने योगाची निवड केली. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे आणि सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त व चिकाटीच्या जोरावर मला जागतिक स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आले.” कोणतेही क्षेत्र निवडले तरी त्यासाठी कठोर परिश्रम, त्याग आणि समर्पण आवश्यक असल्याचा प्रेरणादायी संदेशही तिने युवकांना दिला.
यावेळी आयुष होमिओपॅथी क्लिनिकच्या डॉ. वैष्णवी विक्रांत पाटील यांनी योगाचे आरोग्यदायी फायदे विशद केले. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय असल्याचे सांगताना त्यांनी प्रत्येकाने दिवसातील किमान एक तास स्वतःच्या आरोग्यासाठी राखून ठेवण्याचे आवाहन केले. “प्रत्येक आजारासाठी औषध किंवा शस्त्रक्रियाच हा पर्याय नसतो. योगामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या नियंत्रणात राहू शकतात. आज आरोग्यावर केलेली ही गुंतवणूक भविष्यातील वैद्यकीय खर्च कमी करण्यास मदत करते,” असे त्या म्हणाल्या. योग वर्गांच्या माध्यमातून शंभरहून अधिक महिलांना विविध आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमात भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी योगाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकला. योग ही भारताची हजारो वर्षांची परंपरा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला नवी ओळख मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जगातील १७७ देशांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून, आज योग हा भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे जागतिक प्रतीक बनल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात नागरिक, महिला, युवक, योगप्रेमी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. योगाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि युवकांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

