(देवळे / प्रकाश चाळके)
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित आणि स्वच्छ भविष्यासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (पॅकेज-७) अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लांजा येथे आयोजित या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणासमोरील वाढती आव्हाने लक्षात घेता वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामांसोबत पर्यावरणाचा समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे असून, राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड झाल्यास परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ हा कोकणाच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा असून, या महामार्गामुळे वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यांच्या संगोपन व संवर्धनावरही विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना हिरवाईचा अनुभव मिळण्यासोबतच पर्यावरण संरक्षणालाही मोठा हातभार लागणार आहे.
कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित विभागाचे प्रतिनिधी, स्थानिक प्रशासनातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही स्वीकारण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधत कोकणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देत ‘हरित कोकण’ घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता कुलकर्णी, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, नायब तहसीलदार गोसावी, ईगल कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. प्रेम, तसेच नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पर्यावरणप्रेमी आणि लांजा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

