(संगमेश्वर / प्रतिनिधी)
रात्री घोरण्याच्या समस्येकडे अनेकजण किरकोळ त्रास म्हणून पाहतात. मात्र, हे ‘स्लीप एपनिया’ या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. या आजाराचे वेळेत निदान व उपचार व्हावेत, यासाठी डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाच्या ईएनटी विभागात ७ ते २१ जुलैदरम्यान विशेष निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे.
शिबिरादरम्यान घोरण्याचा त्रास असलेल्या रुग्णांची सवलतीच्या दरात ‘स्लीप स्टडी’ (Sleep Study) तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीद्वारे घोरण्यामागील नेमके कारण शोधून योग्य उपचार निश्चित करता येणार आहेत. शिबिरात दररोज एका रुग्णाची स्लीप स्टडी करण्यात येणार असून, पंधरा दिवसांत एकूण १५ रुग्णांची तपासणी करण्याचे नियोजन असल्याची माहिती ईएनटी तज्ज्ञ डॉ. प्रतीक शहाणे यांनी दिली.
वालावलकर रुग्णालयाच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. सुवर्णा पाटील यांनी सांगितले की, “घोरणे ही केवळ सवय नसून तो एक गंभीर आरोग्यविषयक आजार असू शकतो. स्लीप एपनियामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.”
रात्री मोठ्याने घोरणे, सकाळी उठल्यानंतरही ताजेतवाने न वाटणे, दिवसभर झोप येणे, वाहन चालवताना डुलकी लागणे, झोपेत गुदमरल्यासारखे वाटणे, नैराश्य किंवा कोणत्याही कामात उत्साह न वाटणे अशी लक्षणे असल्यास तातडीने स्लीप स्टडी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
घोरणे म्हणजे नक्की काय?
घोरणे म्हणजे झोपेत श्वास घेताना श्वसनमार्गात होणाऱ्या अडथळ्यामुळे येणारा आवाज. गळ्याच्या मागच्या मऊ स्नायूंवर (टाळूचा मागचा भाग) हवा आदळल्यामुळे कंपन होते आणि त्यातून आवाज निर्माण होतो. हा आवाज सौम्य किंवा खूपच मोठा असू शकतो. घरातील इतरांनाही झोपेतून उठवण्याइतकाही हा आवाज मोठा होऊ शकतो. श्वसन मार्गातील हा अडथळा नाकापासून घशापर्यंत असा कुठेही असू शकतो आणि त्यानुसार या घोरण्याच्या आवाजाचे प्रकार बदलत राहतात. जर हा अडथळा जास्त असेल तर घोरताघोरता मध्येच श्वास घेणे काही काळासाठी बंद होते आणि ती व्यक्ती पुन्हा थोडीशी जागी होऊन पुन्हा श्वास घेणे सुरू करू शकते, याला स्लीप एपनिया असे म्हणतात.
या लक्षणांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार असून, इच्छुकांनी लवकरात लवकर वालावलकर रुग्णालयात संपर्क साधून नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

