(संगमेश्वर)
तालुक्यातील न्यू इंग्लिश देवरुख येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण व क्रीडा विभाग आणि शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेल्या ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षणाचा शुभारंभ संगमेश्वर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभुवने आणि शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनच्या मास्टर ट्रेनर मीनल दशपुत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी देवरुख हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कोकणी सर, फाऊंडेशनच्या तालुका समन्वयक अनघा कांगणे उपस्थित होत्या.
गटशिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभुवने यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना देशाचे आदर्श नागरिक घडवण्यात मूल्यवर्धनचा आणि सोबतच शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मीनल दशपुत्रे यांनी ‘मूल्यवर्धन म्हणजे काय? आणि त्याची आजच्या समाजाला आवश्यकता काय?’ याबाबत माहिती दिली.
राज्य साधन व्यक्ती म्हणून उपस्थित असलेल्या सागर जुनवणे, अजिंक्य नाफडे व योगेश मुळे यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे निरागसता जपत, खेळीमेळीच्या वातावरणात आपले विषय स्पष्ट केले. कृतीयुक्त अध्यापन करताना शिक्षकांनी २०% तर विद्यार्थ्यांनी ८०% बोलून संकल्पना स्पष्ट करून घ्याव्यात यासाठी वर्ग नियम, शांतता संकेत इ. विषयांवर मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पत्ती पूर्ण करत असतानाच समग्र प्रगतीपत्रक व मूल्यवर्धनची मूल्यमापन पद्धती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा नेहा जोशी, मुख्याध्यापक कोकणी सर, प्रशिक्षणाची धुरा वाहणारे समीर काब्दुले आदी मान्यवर उपस्थित होते. नेहा जोशी यांनी मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा धागा पकडून ग्राहक संरक्षण व अखिल भारतीय ग्राहक संघाचे कार्य उपस्थितांसमोर मांडले. बापू जागुष्टे व सतीश वाकसे यांनी आपल्या मनोगतातून मूल्यवर्धन ३.० राबवणाऱ्या यंत्रणेचे आभार मानले व या यंत्रणेचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बाबासाहेब सानप यांनी आभार प्रदर्शन करून या जिल्हास्तरीय प्रशिक्षणाची औपचारिक सांगता केली.