(संगमेश्वर / एजाज पटेल)
बावनदी ते आरवली दरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याच्या ठेकेदार कंपनीकडून अजूनही नागरिकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असल्याने हा विषय आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. जनतेला कोणताही धोका पोहचणार नाही तसेच जनतेच्या जीवावर बेतणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिल्या आहेत. मात्र तरीही अपघाताला आमंत्रण देणारी असुरक्षित वाहतूक केली जात असल्याने महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनांनाही पायदळी तुडवण्याचे काम ठेकेदार कंपनी करत असल्याचे आता समोर आले आहे.
बावननदी ते आरवली महामार्ग चौपदरीकरणचे काम केले जात असताना ठेकदार कंपनीकडून सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. यामध्ये निष्पाप काही लोकांचा बळी गेला असून अनेकजण किरकोळ तर काहींना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. आर्थिक नुकसानीसह न भरून येणाऱ्या घटना घडल्याही आहेत. ठेकदाराची मुजोशाही थांबवी म्हणून मौल्यवान वेळ खर्च करून अनेकदा येथील जनता रस्त्यावर उतरली, अर्ज विनंत्या झाल्या, मात्र तेवढ्या पुरता विनंत्यांना मान आणि पुन्हा चार दिवसाने यांचा कारभार बेलगाम सुरूच!
बावननदी ते आरवली दरम्याच्या असलेल्या सुमारे 39 की. मी. च्या महामार्ग रस्त्याला ठेकेदाराने अक्षरशः मृत्यूमार्गच केला आहे. परिवहन विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसुवून नियमबाह्य प्रमाणापेक्षा दगड-माती भरलेल्या त्यावर अच्छादन नसलेल्या अवजड गाड्यांची वाहतूक भरधाव वेगाने होत आहे. यातील काही गाड्यांना फाळका नाही, अर्धवट लटकणारा फाळका, नंबर प्लेट नाही, इंडिकेटर, लाईट नाही अशा दुर्दशा झालेल्या गाड्या यापूर्वी झालेल्या अपघाताला कारण ठरले असतानाही याची कोणतीच पर्वा ठेकेदाराला नाही.
नुकत्याच संगमेश्वर येथे महामार्ग ठेकेदार आणि त्याची पाठराखण करणाऱ्या महामार्ग प्राधिकरण विभागाच्या विरोधात राहुल गुरव हे उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी आलेल्या महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी उपोषणकर्त्याचे मागण्या रास्त असल्याचे सांगत काही दिवसातच त्या मार्गी लावण्याचे आश्वासन देत तशा सूचना उपस्थिती असलेल्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. यावेळी लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न उपस्थित लोकांनी निदर्शनास आणून दिला असता या पुढे जनतेला धोका पोहचणार नाही, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना अगदी कडक शब्दात त्यांनी या वेळी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना देतानाच यात सुधारणा झाली नाही तर मी स्वतः परिवहन विभागाला पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले होते.
मात्र त्याच फालका नसलेल्या, अवजड व अच्छादन नसलेल्या, नादुरुस्त दुर्दशाग्रस्त अपघाताला निमंत्रण देणाऱ्या गाड्या, त्याही वेगाची मर्यादा न ठेवता धावत असल्याने जनतेला न जुमानणारा, जनतेच्या जीवाशी जीवघेणा खेळ खेळणाऱ्या ठेकेदाराला अजून किती निष्पाप लोकांचा बळी घ्यायचे आहेत, अजून किती लोक जायबंदी होण्याची ते प्रतीक्षा करत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा मुजोर ठेकेदार सबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनांनाही पायदळी तुडवण्याचे काम करत असल्याने त्याच्यावर कारवाई करणार की आणखी काही दुर्घटनेची प्रतीक्षा करणार असा संतप्त प्रश्न केला जात आहे.

