(संगमेश्वर / प्रतिनिधी)
रामकृष्ण हरीच्या गजरात वारकरी संप्रदायाची वार्षिक बैठक ह. भ. प. संदिप सावरटकर यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली. परंपरेप्रमाणे यंदाही कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूरातील नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्याचा ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर झाला.
वारकरी संप्रदायाची सांस्कृतिक विचारधारा घराघरात पोहोचविणे आणि दिशाहीन तरुणाईला योग्य मार्गावर आणण्यासाठी संप्रदायाच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग कसा वाढवायचा, यावर बैठकीत सखोल विचारमंथन झाले. यंदाच्या कार्तिकी वारीत संगमेश्वर तालुका सर्व आयोजनात अग्रेसर राहील, असा विश्वास वारकऱ्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत ह. भ. प. सुरेश भायजे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख मान्यवरांमध्ये अध्यक्ष ह. भ. प. रमेश भंडागळे (मुरादपूर), उपाध्यक्ष ह. भ. प. नंदकुमार लिंगायत (तुरळ), सचिव ह. भ. प. संजय कानाला (चिखली) आणि खजिनदार ह. भ. प. सुनील करंडे (माळवाशी) यांचा समावेश होता. तालुक्यातील सुमारे १५० वारकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीचा समारोप पसायदान पठणाने झाला.

