(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात सध्या अस्वच्छतेचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. प्लॅटफॉर्मलगत मोठमोठे कचऱ्याचे ढिग सडत पडले असून त्यातून पसरलेली तीव्र दुर्गंधी संपूर्ण स्थानक परिसरात दरवळत आहे. या घाणीमुळे डासांचे थवे वाढले असून प्रवाशांना डास चावण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. ही परिस्थिती पाहता “रेल्वे प्रशासन नेमके करत काय आहे?” असा संतप्त सवाल प्रवासी व नागरिक उपस्थित करत आहेत.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अशीच अवस्था निर्माण झाली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांतून छायाचित्रे व व्हिडिओ प्रसिद्ध होताच प्रशासनाने घाईघाईने साफसफाई केली. मात्र ती कारवाई तात्पुरती ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काही दिवस स्वच्छता, त्यानंतर पुन्हा कचऱ्याचे ढिग, डासांचा प्रादुर्भाव आणि नागरिकांच्या तक्रारी. हा प्रकार वारंवार घडत असल्याने ही केवळ दिखाऊ स्वच्छता मोहीम असल्याची भावना बळावत आहे.
एकीकडे शासन आणि रेल्वे प्रशासन “स्वच्छता राखा, रोगराई टाळा” असे संदेश देत जनजागृतीवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. दुसरीकडे, त्याच प्रशासनाच्या अखत्यारीतील रेल्वे स्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य उभे राहत आहे. उपदेश आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील ही दरी म्हणजे उघड दुटप्पीपणा असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, वाढत्या उकाड्यामुळे डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढत आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे. “प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबवा,” अशी ठाम मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्थानक परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी, निष्काळजीपणासाठी जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गरज भासल्यास तात्काळ बदलीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
तसेच, नियमित कचरा उचल व व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करणे, डास नियंत्रणासाठी सातत्याने फवारणी करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ठोस उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. आता प्रशासन कायमस्वरूपी तोडगा काढणार की पुन्हा एकदा तात्पुरती साफसफाई करून विषय झाकला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संगमेश्वर रेल्वे स्थानकातील ही अवस्था केवळ निष्काळजीपणाचे उदाहरण नसून प्रशासनाच्या उदासीनतेचा जाहीर नमुना असल्याची भावना प्रवाशांमध्ये पसरली आहे. आता वरिष्ठ अधिकारी स्वतःहून यामध्ये लक्ष घालणार आहेत का, की पुन्हा एखादा व्हिडिओ व्हायरल होण्याची वाट पाहणार, हाच खरा प्रश्न आहे.

