(रत्नागिरी)
शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने साळवी स्टॉप येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ट्रक टर्मिनसचे लोकार्पण आज जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. सामंत यांनी कोनशिलेचे अनावरण तसेच फित कापून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन केले. शहरातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर-२०२०) अंतर्गत ‘समावेशक आरक्षण’ या विशेष तरतुदीनुसार साळवी स्टॉप येथील आरक्षण क्रमांक ११७ वर या ट्रक टर्मिनसची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधेमुळे शहरातील अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना दिलासा
या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ‘औदुंबर टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ आणि ‘जगदंबा टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ यांना टर्मिनस वापरासाठी अधिकृत पासेसचे वितरण करण्यात आले. त्यामुळे स्थानिक ट्रॅव्हल्स व्यावसायिक, चालक आणि वाहनमालकांना सुरक्षित व नियोजित पार्किंगची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेवक सौरभ मलुष्टे, बंड्या साळवी यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साळवी स्टॉप परिसरात उभारण्यात आलेल्या या नव्या सुविधेमुळे वाहतूक व्यवस्थेला बळ मिळण्याबरोबरच परिसराच्या विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

