(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथे गवारेड्यांनी धुमाकूळ घालत तब्बल १४ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ३ आणि ४ ऑगस्ट रोजी गवारेड्यांनी शेतात घुसून नुकतीच लावलेली भातरोपे खाऊन तसेच तुडवून नष्ट केली. त्यामुळे हाताशी आलेली भातशेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
यंदा भात लावणीच्या कालावधीत पावसाने ओढ दिल्याने किरबेट परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पावसाची प्रतीक्षा न करता अनेक शेतकऱ्यांनी पंपाच्या साहाय्याने पाणी उपलब्ध करून भातशेतीची लावणी पूर्ण केली. मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून लावलेली भातरोपे आता वाढीस लागली असतानाच गवारेड्यांनी शेतांमध्ये घुसून नुकसान केल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.
गवारेड्यांनी भातपीक खाऊन, तुडवून टाकले
किरबेट परिसरातील शेतांमध्ये गवारेड्यांच्या कळपाने प्रवेश करून भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही ठिकाणी गवारेड्यांनी भात खाल्ला, तर काही ठिकाणी शेतात घुसून रोपे तुडवून टाकली. त्यामुळे अनेक शेतांमध्ये भाताची रोपे जमीनदोस्त झाली आहेत.
पावसाची अनिश्चितता, शेतीसाठी लागणारा वाढता खर्च आणि मजुरीचे वाढलेले दर यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच पंपाच्या साहाय्याने पाणी देऊन लावलेली भातशेती गवारेड्यांनी उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांबाबतही नाराजी
गवारेड्यांच्या नुकसानीबरोबरच कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही किरबेटमधील शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. कृषी विभागाचे कर्मचारी अधूनमधून गावात येतात; मात्र शेतकऱ्यांना शेतीसंदर्भात आवश्यक आणि समाधानकारक मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतीमध्ये विविध अडचणी निर्माण होत असताना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, योग्य मार्गदर्शन करावे आणि आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
१४ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान
गवारेड्यांच्या हल्ल्यात किरबेट येथील राजेंद्र जायगडे, सदानंद चाळके, पांडुरंग जायगडे, अनंत पांचाळ, शरद कांबळे, आत्माराम कांबळे, अशोक कांबळे, सुनील अंकुशराव, संजय जायगडे, संजय कांबळे, प्रकाश जायगडे, महेश जायगडे, प्रकाश सुर्वे आणि महेंद्र लाखन या १४ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
वन विभागाने गवारेड्यांचा बंदोबस्त करावा
किरबेट परिसरात गवारेड्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. गवारेड्यांचा बंदोबस्त न झाल्यास पुढील काळातही भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने किरबेट परिसरात पाहणी करून गवारेड्यांचा बंदोबस्त करावा, नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करावा आणि संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी किरबेट येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी तसेच भविष्यात गवारेड्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या नुकसानीचा आणखी फटका बसत असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

