(रत्नागिरी / वार्ताहर)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन राज्यभर उत्साहात साजरा होत असताना रत्नागिरीतील शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत रक्ताच्या तुटवड्यामुळे अडचणीत सापडलेल्या दोन रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला. ऐन वर्धापन दिनी केलेल्या या रक्तदानामुळे दोन गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविण्यास मदत झाली.
रक्ताच्या तुटवड्यामुळे नातेवाईकांची धावपळ
परकार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी ‘बी पॉझिटिव्ह’ (B+) रक्तगटाची तातडीची आवश्यकता होती. मात्र रत्नागिरी जिल्हा रक्तपेढीत या रक्तगटाचा साठा उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी धावपळ सुरू झाली. त्याचवेळी चिंतामणी हॉस्पिटलमधूनही एका रुग्णासाठी ‘बी पॉझिटिव्ह’ रक्ताची तातडीची मागणी करण्यात आली.
एकाच वेळी दोन रुग्णांसाठी रक्ताची गरज निर्माण झाल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. अनेक नियमित रक्तदाते जिल्ह्याबाहेर असल्याने आवश्यक रक्तदाते शोधणे मोठे आव्हान ठरत होते.
शाखाप्रमुखांची तातडीची धाव
ही बाब समजताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे काळबादेवी गाव शाखाप्रमुख अजिंक्य आदेश सुर्वे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. नोकरीची वेळ संपताच त्यांनी थेट जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी गाठून रक्तदान केले. त्यांच्या या तत्परतेमुळे परकार हॉस्पिटलमधील रुग्णाला आवश्यक रक्त वेळेत उपलब्ध झाले.
सोशल मीडियावरील आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दरम्यान, चिंतामणी हॉस्पिटलमधील रुग्णासाठी रक्ताची गरज लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी तालुका कार्यालयाच्या वतीने सोशल मीडियावर तातडीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘बी पॉझिटिव्ह’ रक्तगटाचे दोन तरुण शिवसैनिक काही मिनिटांतच रक्तपेढीत दाखल झाले आणि त्यांनी रक्तदान करून रुग्णाला मदतीचा हात दिला.
समाजकारणाची परंपरा कायम
पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्याऐवजी संकटात सापडलेल्या रुग्णांसाठी धावून जात शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपली. कोणताही गाजावाजा न करता केलेल्या या मदतकार्याचे रत्नागिरीकरांकडून कौतुक होत असून, पक्षाची ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ ही भूमिका त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केली आहे.

