(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्र उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून या उत्सवाला बुधवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ पासून प्रारंभ होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात विविध पूजाविधी, कीर्तन, पुराणकथन, क्रीडा स्पर्धा, नाट्यप्रयोग व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक व शिवपूजा, सकाळी ७.४५ वाजता श्री रामेश्वराच्या ध्वजाची पूजा, सकाळी ८ वाजता पिंपळपार पूजा, सकाळी ८.३० वाजता क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन, सकाळी ९ वाजता होमहवन व नवग्रह शांती होणार आहे. दुपारी २ वाजता श्री प्रकाश फडके यांचे पुराणकथन, दुपारी ३ वाजता ह.भ.प. विद्याधर करंबळेकर (राजापूर) यांचे कीर्तन होईल. सायंकाळी ८ वाजता भोवती व आरती (मानकरी तोडणकरवाडी व नानरकरवाडी) तर रात्री १०.३० वाजता वसंत कानेटकर लिखित ‘प्रिय आईस’ हे नाटक श्री रामेश्वर रंगभूमी, गावखडी सादर करणार आहे.
दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक व शिवपूजा, सकाळी ८ वाजता क्रीडा स्पर्धा, दुपारी २ वाजता पुराणकथन (प्रकाश फडके), दुपारी ३ वाजता कीर्तन (ह.भ.प. विद्याधर करंबळेकर, राजापूर), सायंकाळी ८ वाजता भोवती व आरती (मानकरी सुरकरवाडी व पडयारवाडी) आणि रात्री १०.३० वाजता प्रल्हाद जाधव लिखित ‘विठू माझा लेकरूवाळा’ हे नाटक श्री सिद्धिविनायक नाट्य मंडळ, गावखडी सादर करणार आहे.
दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक व शिवपूजा, दुपारी २ वाजता पुराणकथन, दुपारी ३ वाजता कीर्तन, सायंकाळी ८ वाजता भोवती व आरती (मानकरी तरयेवाडी व बंडबेवाडी) आणि रात्री १०.३० वाजता ‘अस्तित्व’ हे नाटक साई प्रतिष्ठान, गावखडी (मुंबई) सादर करणार आहे.
दि. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता लघुरुद्र, शिवपूजा, सकाळी ८ वाजता क्रीडा स्पर्धा, सकाळी ९ वाजता शिवदर्शन व स्थानिक भजने, सकाळी १० वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, दुपारी २.३० वाजता पुराणकथन, दुपारी ३.३० वाजता कीर्तन, सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव, रात्री ८ वाजता भोवती व आरती (मानकरी शिवगणवाडी, सुतारवाडी, पेटकरवाडी व मुडेवाडी) आणि रात्री १०.३० वाजता प्रशांत दळवी लिखित ‘ध्यानी मनी’ हे नाटक सिद्धाई कान्हाई रंगभूमी, गावखडी सादर करणार आहे.
दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक व शिवपूजा, सकाळी ८ वाजता क्रीडा स्पर्धा, दुपारी २ वाजता पुराणकथन, कीर्तन ह.भ.प. विद्याधर करंबळेकर (राजापूर), सायंकाळी ८ वाजता भोवती व आरती (मानकरी कुंभारवाडी), रात्री १०.३० वाजता बक्षीस वितरण समारंभ आणि रात्री ११ वाजता ‘भटाची बायपास’ हे नाटक सुदर्शन धर्माजी तोडणकर, गावखडी (मुंबई) सादर करणार आहेत. नाट्यप्रयोगानंतर पहाटे लळिताचा कार्यक्रम होणार आहे.
दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हा महाप्रसाद श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ यांच्या सौजन्याने दिला जाणार आहे.
या महाशिवरात्र उत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.
(फोटो: गावखडीचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर)
(छायाचित्रकार: दिनेश पेटकर, गावखडी)

