( साखरपा / भरत माने )
रत्नागिरी-नागपूर महामार्ग (एनएच-66) वरील आंबा घाटात शनिवारी पहाटे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या केबिनला आग लागल्याची घटना घडली. महामार्ग पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक शंभू चरण यादव (वय ४८, रा. हजारीबाग, झारखंड) हे एमएच-०९-एफएल-९०४७ क्रमांकाच्या १४ चाकी ट्रकमधून ३१ टन कोळसा घेऊन जयगड येथून उंब्रज (जि. सातारा) येथे जात होते. पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातील गणेश मंदिराच्या पाठीमागे, रत्नागिरीच्या दिशेने सुमारे एक किलोमीटर अंतरावर ट्रकच्या केबिनमध्ये ओव्हरहिटिंगमुळे वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंबा येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपाली जाधव, पीएसआय पाटील, जीपीएसआय सावंत, पोलीस कर्मचारी वाकरे, लांबोरे, दाभाडे, संकपाळ, शिवलकर तसेच चालक कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. साखरपा पोलीस दूरक्षेत्रातील हेड कॉन्स्टेबल जाधव यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.
यावेळी आंबा गावातील ‘मृत्युंजदूत’ विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसह देवरुख पोलीस स्टेशनचे कर्मचारी, देवरुख नगरपंचायतीचे अग्निशमन दल, महामार्गावरील इतर वाहन
चालक आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे आग विझविण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे आग वेळीच नियंत्रणात आली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. आग विझवल्यानंतर ट्रक सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला. आंबा घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असून घटनेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंबा यांनी दिली.

