(देवळे / प्रकाश चाळके)
‘देवनगरी देवरुख’ या पर्यटन संकल्पनेला आकार देताना क्रांती व्यापारी संघटनेने सुरू केलेल्या ‘एक्सप्लोर देवरुख’ उपक्रमातून देवरुखच्या इतिहासातील अनेक विस्मृतीत गेलेले धागे पुन्हा उजेडात येऊ लागले आहेत. या उपक्रमाअंतर्गत क्रांती व्यापारी संघटना, देवरुख आणि आठल्ये–सप्रे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इ.स. १६६६ मधील ‘बॅटल ऑफ देवरुख’ या ऐतिहासिक घटनेवर व्यापक संशोधन मोहीम हाती घेण्यात आली आहे.
देवरुखच्या धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करत असताना इतिहासग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या इ.स. १६६६ मधील ‘बॅटल ऑफ देवरुख’ या महत्त्वपूर्ण घटनेकडे संशोधकांचे लक्ष वेधले गेले. या लढाईचा इतिहास नव्याने उलगडण्यासाठी पुराव्यांवर आधारित संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांनुसार, पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत असताना आदिलशाहीचे सरदार पीरमिया आणि ताजखान यांनी देवरुख ताब्यात घेऊन येथे लष्करी तळ उभारला होता. त्यानंतर स्वराज्याच्या वतीने आनंदराव आणि व्यंकोजी दत्तो यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने देवरुखवर मोहीम राबवून आदिलशाही सैन्याचा पराभव केला. या लढाईत पीरमिया आणि ताजखान मारले गेल्याचा तसेच मराठा सैन्याने विजय मिळवत एक हत्ती आणि अनेक घोडे हस्तगत केल्याचा उल्लेख काही ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतो. या संदर्भांमुळे देवरुखच्या शिवकालीन इतिहासाचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
या संशोधन मोहिमेचा उद्देश कोणताही पूर्वनिश्चित निष्कर्ष मांडणे नसून, उपलब्ध ऐतिहासिक पुरावे, कागदपत्रे आणि स्थानिक संदर्भांच्या आधारे देवरुखचा खरा इतिहास सर्वांसमोर आणणे हा आहे.
या मोहिमेदरम्यान बॅटल ऑफ देवरुख (१६६६), महिमतगड, कुंडी घाट, मुरादपूर, प्राचीन देवस्थाने, सरदार घराणी, पिरांच्या समाध्या, वीरगळ, सैनिक व घोड्यांच्या समाध्या, प्राचीन व्यापारी मार्ग, लोकपरंपरा आणि उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. तसेच संभाव्य रणांगण, त्या काळातील लष्करी हालचाली आणि देवरुखचे सामरिक महत्त्व यांचाही शास्त्रीय पद्धतीने शोध घेतला जाणार आहे.
या संशोधनासाठी इतिहास संशोधक, मोडी लिपीचे अभ्यासक, पुरातत्त्व तज्ज्ञ, विविध ऐतिहासिक संशोधन संस्था, स्थानिक इतिहासाचे जाणकार ज्येष्ठ नागरिक आणि अभ्यासक यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. क्षेत्रभेटी, ऐतिहासिक स्थळांचे दस्तऐवजीकरण, ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, गॅझेटिअर, बखरी, मोडी कागदपत्रे आणि उपलब्ध संशोधनग्रंथांच्या आधारे देवरुखच्या इतिहासाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर आणि कार्याध्यक्ष नितीन हेगशेट्ये यांच्या पुढाकारातून या उपक्रमाची संकल्पना साकार झाली आहे. या मोहिमेला देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, आठल्ये–सप्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, समाजशास्त्र विभागाचे प्रा. शृंगारे आणि डॉ. नारगुडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या संशोधन मोहिमेमुळे देवरुखचा इतिहास नव्या पिढीसमोर पुराव्यांसह मांडला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शिवकालीन इतिहासातील देवरुखचे स्थान अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असून, भविष्यात ‘बॅटल ऑफ देवरुख’ या ऐतिहासिक घटनेला महाराष्ट्राच्या इतिहासात योग्य स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘देवनगरी देवरुख’ हा केवळ पर्यटन प्रकल्प नसून, आपल्या भूमीचा इतिहास, पराक्रम, संस्कृती आणि वारसा जगासमोर मांडण्याचा लोकसहभागातून उभा राहिलेला उपक्रम आहे. देवरुखच्या इतिहासातील प्रत्येक पुरावा शोधून त्याला योग्य स्थान मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे, असे क्रांती व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

