(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
आज (दि. 03/06/2025) सकाळी 11 वाजता संगमेश्वर-देवरुख मार्गावर बुरुंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयासमोर एक गंभीर अपघात झाला. शाळेसमोर रस्त्यावर उभा असलेला बलकर कंटेनर (MH13 DQ7747) काही कारणास्तव बंद अवस्थेत रस्त्यावर उभा होता. या कंटेनरमध्ये सोलापूरहून संगमेश्वरकडे सिमेंट भरलेली मालवाहतूक सुरू होती.
दरम्यान, मालवणहून ठाण्याकडे जात असलेली MH04 KA 0094 ही रेनॉल्ट क्विड कार अचानक अनियंत्रित झाली. कारचा वेग आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ती थेट समोरील कंटेनरच्या मागील टायरखाली जाऊन धडकली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले, मात्र पुढील एअरबॅग्स वेळेवर उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या अपघातात कारमधील तिघांना किरकोळ दुखापत झाली. प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे: 1. श्री. रुपेश सहदेव पालव (वय 43) – रा. ठाणे, 2. श्रीमती सुविधा सहदेव पालव (वय 65) – रा. ठाणे, 3. कु. ऋतुजा रुपेश पालव (वय 36) – रा. ठाणे
यामध्ये श्रीमती सुविधा पालव यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तत्काळ संगमेश्वर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. बलकर कंटेनरचा चालक शकील इस्माईल खतीब (वय 53, रा. बेळगाव) असल्याचे समजते.