(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एलपीजी वितरण व्यवस्थेवर परिणाम होऊ नये आणि उपलब्ध साठ्याचे नियोजनबद्ध वाटप व्हावे, यासाठी शासनाने नवीन घरगुती गॅस जोडण्यांच्या वितरण प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासोबतच ग्राहकांकडून होणाऱ्या सिलेंडर बुकिंगसाठी ठराविक कालावधीचे बंधनही कायम ठेवण्यात आले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन गॅस जोडणी देण्याबाबत राज्य शासनाने गॅस कंपन्यांना स्पष्ट निर्देश जारी केले असून त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू आहे. उपलब्ध गॅस साठ्याचे संतुलित व्यवस्थापन आणि सर्व ग्राहकांना समान प्रमाणात पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर संभाव्य ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी वापराबाबत काही नियामक उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यानुसार ग्राहकांना दोन सिलेंडर बुकिंगदरम्यान निश्चित कालावधीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्यास आळा बसण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
दरम्यान, नवीन जोडण्यांवर तात्पुरती मर्यादा असली तरी विद्यमान ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून नियमितपणे एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेला गॅस पुरवठा सुरळीत राहिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, समतोल आणि शिस्त राखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग सातत्याने गॅस एजन्सींच्या संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुरवठा व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळोवेळी केल्या जात असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

