(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेत, जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १८ जून) झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत शाळांचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन समित्या आणि संबंधित विभागांनी शालेय वाहतूक नियमावली तसेच न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले. प्रत्येक शाळेने शालेय परिवहन समितीमार्फत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा नियमित आढावा घ्यावा, वाहनांची नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र, विमा, चालक परवाना आणि बॅज यांची वैधता तपासावी, अशी सूचना करण्यात आली. विद्यार्थी सुरक्षित वाहतूक संदर्भातील माहितीफलक शाळांच्या वाहनतळांवर अनिवार्यपणे प्रदर्शित करणे, वाहनांचे थांबे निश्चित करणे तसेच पालकांनीही मुलांच्या शाळेत ने-आण करण्यासाठी सुरक्षित पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व शाळांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी नोडल अधिकारी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.
बैठकीत शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांवर तसेच अनधिकृत, अवैध आणि धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले. यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाला संयुक्त तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांसमोरील रस्त्यांवर गतिरोधक, इशारा फलक, रंबल स्ट्रिप्स आणि अन्य आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने उभारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित यंत्रणांना देण्यात आले. शाळा परिसरात अपघातमुक्त वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांच्या मागणीनुसार आवश्यक ठिकाणी आणि वेळेनुसार बससेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य परिवहन महामंडळाला देण्यात आल्या. तसेच शैक्षणिक सहली, क्रीडा स्पर्धा आणि अन्य शालेय उपक्रमांसाठी खासगी वाहनांऐवजी अधिकृत स्कूल बसेस किंवा एसटी महामंडळाच्या बसेसचा वापर करण्याबाबत शिक्षण विभागाला निर्देश देण्यात आले.
या बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिशित यादव, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप पाटील, शिक्षण विभागाच्या उत्कर्षा शिंदे, चंद्रकांत सूर्यवंशी, एस. जे. मुरकुटे, राज्य परिवहन महामंडळाचे अश्वजीत जानराव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जनक धोत्रेकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे राजेंद्र कुलकर्णी व अनिल पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या भारती बिराजे यांच्यासह वाहतूकदार प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

