(चिपळूण / वार्ताहर)
युवकांमध्ये अमर्याद ऊर्जा, कल्पकता आणि परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानासोबतच कौशल्यांचा विकास करून त्यांचा योग्य दिशेने उपयोग केला, तर वैयक्तिक प्रगतीसोबतच समाज आणि राष्ट्राच्या विकासालाही नवी गती मिळेल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने वेळेचे नियोजन, शिस्त, प्रामाणिकपणा, संघभावना आणि सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे अशोक निर्मळ यांनी केले.
सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात राज्यस्तरीय ऑनलाइन शपथविधी सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाने झाली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अशोक निर्मळ उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य टी. वाय. कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच महाविद्यालयाचे ‘करिअर कट्टा’ समन्वयक प्रा. जयसिंग चवरे यांचेही महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशोक निर्मळ म्हणाले की, युवकांची ऊर्जा, कल्पकता आणि नवनिर्मितीची क्षमता ही देशाची मोठी ताकद आहे. ही क्षमता योग्य दिशेने वापरली गेल्यास तिचा परिणाम केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित राहत नाही, तर समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासालाही त्याचा मोठा फायदा होतो. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत असतानाच समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली पाहिजे.
ज्ञान, कौशल्य आणि चारित्र्य यांचा समतोल साधणारी युवा पिढीच विकसित भारताचे स्वप्न साकार करू शकते, असेही त्यांनी नमूद केले. रोजगाराच्या बदलत्या संधी लक्षात घेता विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबतच विविध कौशल्ये आत्मसात करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘करिअर संसद’ विद्यार्थ्यांचा शपथविधी
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील ‘करिअर संसद’ विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. यामध्ये मुख्यमंत्री कु. स्नेहल शशिकांत खोपे, नियोजन मंत्री कु. यादव साहिल अनिल, कायदे व शिस्तपालन मंत्री कु. क्रिश नेताजी पवार, सामान्य प्रशासन मंत्री कु. साळुंखे प्राची संतोष, माहिती व प्रसारण मंत्री कु. भुवड अश्विनी संदीप, उद्योजकता विकास मंत्री कु. वनये सानिका सुभाष, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री कु. घाडगे श्रवण संदेश, कौशल्य विकास मंत्री कु. घाणेकर वैष्णवी राजेंद्र, संसदीय कामकाज मंत्री कु. साळवी रिया संभाजी, महिला व बालकल्याण मंत्री कु. कदम सांची चंद्रकांत तसेच सदस्य कु. जड्याळ सृष्टी संजय आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ‘करिअर कट्टा’ समन्वयक प्रा. जयसिंग चवरे यांनी महाविद्यालयात ‘करिअर संसद’ स्थापन करण्यामागील भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य टी. वाय. कांबळे म्हणाले की, विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांच्यामध्ये रोजगारक्षम कौशल्यांचा विकास होणेही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी महाविद्यालय विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
कार्यक्रमास डॉ. दिप्ती शेंबेकर, प्रा. अवनी कदम, प्रा. पूजा आवले, प्रा. माधुरी जाधव यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नेहा कोंडविलकर यांनी केले, तर कु. जानवी जाधव हिने आभार मानले.

