(लांजा /प्रतिनिधी)
तालुक्यातील केळंबे-माळवाडी येथे जमिनीच्या वादातून ३६ वर्षीय तरुणाला लाकडी ठोंब्याने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास केळंबे येथील गट क्रमांक ९२ मधील जमिनीवर ही घटना घडली. याप्रकरणी प्रसाद चंद्रशेखर जठार (वय ३६, रा. माळवाडी, केळंबे) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीनुसार, संबंधित जमिनीमध्ये संशयितांकडून कुंपण घालण्याचे काम सुरू होते. यावेळी प्रसाद जठार यांनी तेथे जाऊन कुंपण घालण्याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने संशयितांनी त्यांच्याशी वाद घालत थेट मारहाणीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
यामध्ये विलास जयसिंग शेलार (४५) याने फिर्यादीची मान पकडून त्यांना जखडून ठेवले, तर शुभम चंद्रशेखर शेलार (२५) याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत हात पिरगळून धक्काबुक्की केली. त्यानंतर वादाने हिंसक रूप धारण केले. विलास शेलार याने हातातील लाकडी ठोंबा फिर्यादीच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. त्याचवेळी शुभम शेलार याने कमरेवर, तर ओम उर्फ घास चंद्रशेखर शेलार (१९) याने पाठीवर लाकडी ठोंब्याने वार करून गंभीर दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मारहाणीनंतर प्रसाद जठार हे घटनास्थळावरून निघून जात असताना आरोपींनी त्यांना ढकलत कुंपणाच्या गेटबाहेर काढले. यावेळी मुख्य आरोपी विलास शेलार याने, “यापूर्वी तू वाचला आहेस, यापुढे तुला डंपरखाली चिरडून टाकीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रसाद जठार यांनी तातडीने लांजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ अंतर्गत विलास शेलार, शुभम शेलार आणि ओम उर्फ घास शेलार या तिघांविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), १३१ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जमिनीच्या वादातून भरदिवसा घडलेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे केळंबे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.

