(लांजा)
खैर लाकडाच्या अवैध तस्करीविरोधात एटीएसने राबवलेल्या कारवाईमुळे संपूर्ण लांजा तालुक्यात खळबळ उडाली आहे. ठाणे आणि नवी मुंबई येथील अँटी टेररिझम स्क्वॉडच्या (ATS) विशेष पथकाने शुक्रवारी लांज्यातील एका भागात गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
या संपूर्ण कारवाईबाबत अधिकाऱ्यांनी तपशील देण्यास टाळाटाळ केली असून गुप्तता पाळण्यात आली आहे. तरुणाला मुंबईत नेण्यात आले असून त्याच्याकडून खैर लाकडाच्या विक्रीतून मिळणाऱ्या अवैध पैशांची चौकशी केली जात आहे. या रकमेचा वापर अतिरेकी कारवायांमध्ये होतो का, याचाही तपास एटीएसकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही चिपळूण तालुक्यात अशाच स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणात खैराच्या तस्करीतून मिळणारा पैसा अतिरेकी संघटनांकडे वळत असल्याचे गंभीर तपशील समोर आले होते. त्यामुळे लांज्यातील कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, पडघा बोरीवलीशी संबंधित कनेक्शन असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.