(रत्नागिरी)
जिल्ह्यात काही भागांमध्ये पाण्याची तात्पुरती टंचाई निर्माण झाली असून, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी विहिरी, विंधन विहिरी आणि नळाच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, तसेच पाणी बचतीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पाऊस लांबल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत धरणांतील साठा, विविध जलस्त्रोतांची स्थिती आणि पाणीपुरवठ्याची गरज याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सध्या काही शहरांसाठी पुढील २५ ते ३० दिवस पुरेल इतकाच पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध असल्याची माहिती संबंधित यंत्रणांनी दिली.
आजच अहवाल सादर करण्याचे निर्देश
नगरपालिका, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीने आपापल्या कार्यक्षेत्रातील गावांचे सर्वेक्षण करून पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध स्रोत आणि टँकर मागणी याबाबतचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
टंचाई काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे नियोजन करण्यावर भर देताना त्यांनी रिसॉर्ट्स आणि होमस्टेतील स्विमिंग पूलसाठी पिण्याव्यतिरिक्त पाण्याचा वापर तत्काळ थांबवण्याचेही निर्देश दिले. लोटे एमआयडीसी परिसरातील कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. सार्वजनिक पाणी स्रोतांच्या ५०० मीटर परिसरातील अन्य जलस्रोतांची माहिती जल आराखड्यात समाविष्ट करण्याचे निर्देशही देण्यात आले.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, एमआयडीसी, विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

