(देवरुख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या संबंधित विभागप्रमुखांनी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. नागरिकांना शासकीय योजनांचा आणि मूलभूत सुविधांचा लाभ मिळताना अडचणी येणार नाहीत, याकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी दिल्या.
देवरुख येथील संपर्क कार्यालयात आयोजित नागरिकांच्या चर्चासत्रात आमदार निकम यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी पाणी, वीज, रस्ते, शहरातील नागरी सुविधा यांसह विविध प्रश्न मांडले.
यावेळी आमदार शेखर निकम यांच्यासह तालुकाध्यक्ष राजू पोमेंडकर, शहराध्यक्ष हनीफ हरचीरकर, युवक तालुकाध्यक्ष प्रतीक साळवी, पंकज पुसाळकर, नितीन भोसले, बाळू ढवळे तसेच तहसीलदार अमृता साबळे यांच्यासह बांधकाम, कृषी, जलजीवन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
येडगेवाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी बसविण्यात आलेला पंप बेकायदेशीरपणे तोडण्यात आल्याने धनगरवाडीचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. हा पंप पूर्ववत करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी संतोष येडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
वीज खंडित होण्याच्या समस्येकडे लक्ष
देवरुखसह ताम्हाणे आणि तुळसणी परिसरात गेल्या आठवडाभरापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दाही चर्चेत मांडण्यात आला. उपसभापती प्रफुल्ल बाईत, युवक तालुकाध्यक्ष प्रतीक साळवी, संतोष पाल्ये, पपु गोवळकर आणि हनीफ हरचीरकर यांनी याकडे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
देवरुख शहरातील विविध नागरी समस्यांबाबत उबाठाचे नगरसेवक बाळा कामेरकर, निधा कापडी, तालुकाप्रमुख बोरूकर, क्रांती व्यापारी संघटनेचे निखिल कोळवणकर आदींनीही संबंधित प्रश्न मांडले.
चर्चासत्रात तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी आपापल्या समस्या आमदार निकम यांच्यासमोर मांडल्या. यावेळी आमदार निकम यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून समस्यांची माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी गांभीर्याने समजून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी आणि प्रलंबित प्रश्न शक्य तितक्या लवकर मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

