(लांजा)
तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तसेच तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वाँदो स्पोर्ट्स असोसिएशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राष्ट्रीय तायक्वाँदो ब्लॅक बेल्ट परीक्षा व पंच (रेफरी) रिफ्रेशर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
ही परीक्षा रत्नागिरी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडली.
अखिल भारतीय स्तरावर आयोजित या परीक्षेत खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्याची व शारीरिक क्षमतेची कसून चाचणी घेण्यात आली.
या महत्त्वपूर्ण परीक्षेत लांजा तालुक्यातील गुरुकुल तायक्वॉंदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. यामध्ये तेजस्वी दशरथ लाड, आदिश्री अभय शेट्ये, रोहन चंद्रकांत साबळे, योगेश ईश्वर तोंडारे, भक्ती भागवत कुंभार, विराज संजय जाधव आणि आर्या सचिन पवार यांनी ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. तसेच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, शितल विरेंद्र आचरेकर आणि तेजस दत्ताराम पावसकर यांनी राष्ट्रीय पंच (रेफरी) रिफ्रेशर परीक्षा पूर्ण केली.
या यशानंतर सर्व खेळाडूंनी लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. किरण रविंद्र सामंत साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार महोदयांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी तायक्वॉंदो अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव व मार्गदर्शक तेजस वडवलकर उपस्थित होते. तसेच उपाध्यक्ष अमोल रेडीज, सहसचिव अनुजा कांबळे तसेच सदस्य रोहित कांबळे, लक्ष्मण कररा, कुक्कीवॉन ब्लॅक बेल्ट ज्येष्ठ खेळाडू, स्वीय सहाय्यक परेश खातू, तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा, ‘७ डान ब्लॅक बेल्ट’ आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीचंद मेश्राम, जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
गुरुकुल तायक्वॉंदो अकॅडमीत कठोर सराव व शिस्तबद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतर खेळाडूंनी ब्लॅक बेल्ट परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. स्वसंरक्षण आणि क्रीडा क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘ब्लॅक बेल्ट’ पदवी मिळवल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
भेटीदरम्यान आमदार महोदयांनी खेळाडूंशी संवाद साधत सांगितले की, “आजच्या काळात स्वसंरक्षणाची कला आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. गुरुकुलच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश संपूर्ण लांजा शहरासाठी अभिमानास्पद आहे. या खेळाडूंनी राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करावे.”
तसेच या खेळाडूंना अकॅडमीचे प्रशिक्षक तेजस पावसकर, तेजस्विनी आचरेकर, शितल आचरेकर आणि गौरव खेडकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच आमदार सामंत यांनी खेळाडूंना क्रीडा सुविधांबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास पदाधिकारी, खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

