(रत्नागिरी / वार्ताहर)
गेल्या ३५ वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्था दमदार आणि यशस्वी वाटचाल करत आहे. कर्जदार, ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे संस्थेने आजवर प्रगती साधली आहे. सहकार क्षेत्रातील नियमांमध्ये सातत्याने बदल होत असल्याने कर्जाची परतफेड शिस्तबद्ध आणि वेळेत होणे आवश्यक आहे. कर्जदार तसेच जामीनदारांनी कर्जफेड वेळेत होईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. सहकार चळवळ अधिक बळकट करत संस्थेला भविष्यात आणखी मोठी झेप घ्यायची आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा युगंधरा राजेशिर्के यांनी केले.
पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. यावेळी उपाध्यक्षा सुजाता तांबे, संचालिका स्वप्ना सावंत, जानकी बेलोसे, प्राची शिंदे, भाग्यश्री निंबाळकर, सल्लागार मीना रेडीज, मुख्य कार्यकारी अधिकारी कृतिका सुवरे आणि व्यवस्थापिका आदिती पेजे उपस्थित होत्या. सभेला मोठ्या संख्येने महिला सभासद उपस्थित होत्या.
युगंधरा राजेशिर्के म्हणाल्या की, संस्थेच्या ३५ वर्षांच्या वाटचालीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही प्रसंगी कर्मचाऱ्यांनाही अडचणी सहन कराव्या लागल्या. मात्र, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सचोटीने काम केल्यामुळे संस्थेला यश मिळाले. संस्था टिकवताना भ्रष्टाचाराला कधीही थारा दिला नाही. संचालक मंडळाकडून अनावश्यक उधळपट्टी न करता सामाजिक बांधिलकी जपत काम करण्यात आले. निस्वार्थी समाजकार्याची आवड असलेल्या संचालक मंडळातील सदस्यांनी वेळ देऊन आणि त्यागाची भूमिका घेऊन केलेल्या सहकार्यामुळेच संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव
वार्षिक सभेत वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल खेड शाखेच्या शाखाधिकारी शुभदा गोगावले यांचा गौरव करण्यात आला. तसेच लांजा शाखेला उत्कृष्ट शाखा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या महिला कर्जदारांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
कर्मचाऱ्यांच्या मुलांनी विविध क्षेत्रांत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यामध्ये साहील गोगावले, सिया वारे, ऋतुजा पुरात, ऋषभ कोतवडेकर, शार्दुल पेजे आणि शर्वरी आडविलकर यांचा समावेश होता.
तसेच संस्थेतून निवृत्त झालेल्या संजीवनी गांधी, पिग्मी प्रतिनिधी नेत्रा सागवेकर, सिद्धी कोतवडेकर आणि निता धुळप यांचाही गौरव करण्यात आला. आवर्त ठेव योजनेसाठी विशेष योगदान दिल्याबद्दल तेजस येद्रे, समिधा कदम आणि यास्मिन नाखवा यांचा सन्मान करण्यात आला.

