(लांजा)
तालुक्यातील मौजे कुर्णे येथे राहत्या घरात सुरेश रामचंद्र पडये (वय ४५) यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. हा मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट होताच रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगवान तपास करत अवघ्या २४ तासांत खुनाचा छडा लावला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दि. १९ जानेवारी रोजी सुरेश पडये यांचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला होता. प्रारंभी लांजा पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र मृतदेहावरील जखमा आणि घरातील सांडलेले रक्त पाहता हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपाताचा संशय बळावला. याची दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी तपास करून परिसरातून गोपनीय माहिती संकलित केली. संशयाच्या आधारे नंदकुमार रविंद्र पांचाळ (वय २५, रा. कुर्णे सुतारवाडी) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात असे निष्पन्न झाले की, मयत सुरेश पडये आणि आरोपी नंदकुमार पांचाळ हे मित्र होते. मात्र, आपल्याला शिवीगाळ केल्याच्या रागातून नंदकुमारने सुरेश यांच्या घरातच त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

