(मुंबई)
राज्यातील बसस्थानकांच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. अवघ्या १५ दिवसांत एसटीच्या उत्पन्नात तब्बल ४३ कोटी ८३ लाख रुपयांची वाढ नोंदविण्यात आली असून, दररोजच्या सरासरी उत्पन्नात सुमारे ३ कोटी रुपयांची भर पडली आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
१ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत एसटी महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न ४९५ कोटी ३४ लाख रुपये इतके झाले. मागील वर्षी याच कालावधीत हे उत्पन्न ४५१ कोटी ५१ लाख रुपये होते. यामुळे उत्पन्नात ४३ कोटी ८३ लाख रुपयांची, म्हणजेच ९.७१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
उत्पन्नवाढीत रायगड, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नांदेड या विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पुणे विभागाने सर्वाधिक ५ कोटी ९७ लाख रुपयांची वाढ नोंदवली, तर सातारा विभागाने ३ कोटी ४६ लाख, छत्रपती संभाजीनगरने २ कोटी ६६ लाख, नांदेडने २ कोटी २७ लाख, रायगडने २ कोटी १७ लाख आणि अमरावतीने १ कोटी ६० लाख रुपयांची वाढ नोंदवली.
याबाबत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येवर आणि महसुलावर मोठा परिणाम होत होता.
न्यायालयाच्या आदेशानुसार २०० मीटर परिघात कठोर कारवाई करण्यात आली. परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे प्रवाशांचा कल पुन्हा एसटीकडे वाढला असून त्याचे प्रतिबिंब उत्पन्नवाढीत स्पष्टपणे दिसून येत आहे.
राज्यातील सर्व बसस्थानक परिसर अवैध प्रवासी वाहतुकीपासून मुक्त करण्यासाठी ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कायदेशीर सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य असून, एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले.

