(रत्नागिरी / वार्ताहर)
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी, परीक्षेचा सराव व्हावा आणि गुणवत्तावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सडये केंद्राच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ कोतवडे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात झाला. पंचायत समिती सदस्य स्वप्नील मयेकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
तालुक्यातील सर्व केंद्रांमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा सुरू करणारे यंदाचे हे कदाचित पहिलेच केंद्र असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख मानसी मोने, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार कुवार, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार, दीपक कदम, संतोष रावणंग यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी सडये केंद्राच्या वतीने स्वप्नील मयेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात केंद्रप्रमुख मानसी मोने यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी सराव प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तसेच शिष्यवृत्ती परीक्षेचे मासिक नियोजन करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी मार्गदर्शन करताना स्वप्नील मयेकर म्हणाले, “तालुक्यातील सर्व केंद्रांमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा सुरू करणारे यावर्षीचे हे कदाचित पहिलेच केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा पुरेपूर लाभ घेऊन गुणवत्तायादीत स्थान मिळवावे आणि रत्नागिरी तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे.”
प्रश्नपत्रिकांचा खर्च स्वतः उचलणार
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीला अधिक चालना मिळावी यासाठी मयेकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेतील स्वतःचा उपस्थिती भत्ता तसेच पुढील सर्व शिष्यवृत्ती सराव परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा खर्च स्वतः उचलणार असल्याची घोषणा केली.
सराव प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी योगदान देणारे म्हादे, महेंद्र ढाकणे, दत्तात्रय बुरले, दीपक जाधव, यास्मिन कोतवाल, योगेश जगताप आणि निकुंबे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
“विद्या हीच खरी संपत्ती असून कठोर परिश्रमाला यशाचा पर्याय नाही,” असा प्रेरणादायी संदेश स्वप्नील मयेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या सराव परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून दीपक कदम यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष रावणंग यांनी केले. उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

