( खेड )
खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज (गुरुवार 18 जून) रोजी पहाटे सुमारे 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत गुरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत एकूण २५ जनावरे होरपळून मृत्यूमुखी पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोठ्यात पहाटे अचानक आग लागल्याने परिसरात गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र गोठ्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. या आगीत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे दगावली असून केवळ २ म्हशींना वाचविण्यात यश आले.
घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फायरमन आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आग इतर भागात पसरण्यापासून रोखण्यात यश आले. मात्र तोपर्यंत मोठा अनर्थ घडला होता.
आगीमुळे पशुपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संपूर्ण कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्टसर्किट किंवा विद्युत कारणाची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

