(दापोली / वार्ताहर)
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांच्यात ज्ञानाची आणि विचारांची समृद्धी वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा साखळोली क्र. १ येथे ‘ज्ञानसमृद्धी वाचनालया’च्या वतीने ‘वाचनालय आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा घरी वाचण्यासाठी एक पुस्तक देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पुस्तके पोहोचवून वाचनाची सवय रुजविण्याचा हा उपक्रम ज्ञानसमृद्ध समाजनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
ज्ञानसमृद्धी वाचनालयाच्या वतीने आयोजित ‘यशवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्या’त वाचनालयाचे सचिव संदीप गोरीवले यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देताना, “दरमहा विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देऊन वाचनक्रांती घडवूया आणि ज्ञानसमृद्धीचा दीप प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया,” असे आवाहन केले.
स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच ग्रंथपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव
शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या आद्या विनोद गोरीवले, माही सचिन गौरत, मैत्री मनोहर आडविलकर, सिद्धांत शुद्धोधन तांबे आणि सिया महेश देवघरकर या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक समीर ठसाळ यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल वैभवी विनोद गोरीवले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या मागील कार्यकाळातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंदाचाही गौरव करण्यात आला.
‘वाचनाची सवय जोपासणे अत्यावश्यक’
संदीप गोरीवले यांनी आपल्या मनोगतात ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश आजच्या डिजिटल युगातही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले. इंटरनेटच्या वेगवान युगात विद्यार्थ्यांमध्ये विचारांची स्थिरता, संवेदनशीलता आणि समृद्ध व्यक्तिमत्त्व विकसित करायचे असेल, तर वाचनाची सवय जोपासणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाचनालयाचे उपाध्यक्ष रामकृष्ण धामणसकर यांनी ग्रंथालयाचे महत्त्व स्पष्ट करताना, ग्रंथालय हे ज्ञानाचे केंद्र असून पुस्तके आयुष्यभर मार्गदर्शन करणारे अक्षय गुरू असल्याचे सांगितले. छोट्या-छोट्या पुस्तकांच्या सातत्यपूर्ण वाचनातून ज्ञानाचा मोठा साठा निर्माण होतो. शिक्षक विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी देतात, त्या संधीचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून आपली ज्ञानकक्षा विस्तारावी, असे आवाहन त्यांनी केले.
वाचनालयाचे संचालक आणि गुहागर महाविद्यालयाचे प्रा. मंगेश गोरीवले यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. गुरू हे जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ असल्याचे सांगत त्यांनी भगवान श्रीकृष्णांनाही सांदीपनी ऋषींकडून शिक्षण घ्यावे लागले, याचा संदर्भ दिला. कृतीयुक्त शिक्षक राष्ट्र घडवतात. शाळेच्या चार भिंती केवळ इमारत न राहता त्या विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणाऱ्या ‘बोलक्या’ झाल्या पाहिजेत. आयुष्यातील संघर्षातूनच व्यक्तिमत्त्व घडते आणि समाजात स्वतःची ओळख निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केले ऋणनिर्देशाचे मनोगत
यानंतर आद्या गोरीवले, शुभ्रा घडवले आणि जिया घाणेकर या विद्यार्थिनींनी ऋणनिर्देशपर मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अनिल बुरटे होते.
कार्यक्रमाला पोलीस पाटील सुनील गौरत, देवळ कमिटी अध्यक्ष अनिल शिंदे, दिनेश जाधव, सुरेश बुरटे, अनंत बुरटे, रामकृष्ण (बंडू) बर्वे, सुरेश मिसाळ, केशव गौरत, विनोद गोरीवले, ग्रंथपाल मनोज पवार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि वाचनालयाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला देणगी
यावेळी सुजीत देवघरकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळेसाठी ५ हजार रुपयांची देणगी दिली. तसेच वाचनालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
‘वाचनालय आपल्या दारी’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या घराघरांत पुस्तके पोहोचणार असून, त्यातून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय आणि वाचनसंस्कृती रुजण्यास मदत होईल. हा उपक्रम ज्ञानसमृद्ध समाजनिर्मितीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

