(खेड/ रत्नागिरी प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गुरुवारी २८ मे रोजी दुपारी केमिकल्सने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून केमिकल टँकर पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास परशुराम घाट उतरत असताना केमिकल्सने भरलेल्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. वेगात असलेला टँकर रस्त्याबाहेर जाऊन भीषणरीत्या अपघातग्रस्त झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की चालक गाडीखाली अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चिपळूण नगरपालिकेच्या अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशामक दल आणि पोलिसांनी संयुक्तरित्या बचाव व मदतकार्य हाती घेत परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू केले. केमिकल्सने भरलेला टँकर असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली.
अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवत पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना वाहनचालकांना दिल्या. दरम्यान, अपघातस्थळी पंचनामा करण्यात आला असून, टँकरवरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले याचा तपास सुरू आहे. परशुराम घाटातील या भीषण अपघातामुळे वाहनचालकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, घाटमार्गावरील वाढते अपघात पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहेत.

