(देवरुख / वार्ताहर)
मुसळधार पाऊस, घनदाट जंगल, डोंगरदऱ्या आणि काळोख अशा प्रतिकूल परिस्थितीत अथक प्रयत्न करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संगमेश्वर-देवरुख मुख्य विद्युत वाहिनीतील बिघाड रात्रीच दुरुस्त केला. त्यामुळे देवरुख शहरासह परिसरातील सुमारे २० ते २५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर-देवरुख मुख्य विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाला. या वाहिनीवरून देवरुख आणि साडवली उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जातो. बिघाडामुळे देवरुख उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या ११ केव्ही देवरुख, पांगरी, आंगवली, हरपुडे तसेच साडवली उपकेंद्रातून पुरवठा होणाऱ्या ११ केव्ही ताम्हाणे, कोसुंब आणि साडवली वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला.
तीन किलोमीटर घनदाट जंगलातून कर्मचाऱ्यांची पायपीट
संगमेश्वर ते देवरुख ही मुख्य विद्युत वाहिनी सुमारे २१ किलोमीटर लांबीची असून ती डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलातून जाते. रात्रीच्या वेळी बिघाड झाल्याने नेमकी जागा शोधून वाहिनी दुरुस्त करणे हे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान होते.
देवरुख शहर आणि ग्रामीण शाखा कार्यालयातील जनमित्रांनी एकत्रितपणे वाहिनीची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान नवनिर्माण कॉलेजच्या पाठीमागील लोवले-पडेवाडी परिसरातील घनदाट जंगलात वाहिनी तुटल्याचे निदर्शनास आले.
बिघाडाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुमारे तीन किलोमीटर घनदाट जंगलातून पायी जावे लागले. झाडे-झुडपे बाजूला करत, आवश्यक साहित्य सोबत घेऊन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
दोन डोंगरांना जोडणाऱ्या वाहिनीची दुरुस्ती
बिघाड झालेली वाहिनी दोन डोंगरांच्या टोकांना जोडणाऱ्या सुमारे २०० मीटर लांबीच्या गाळ्यातील असल्याचे आढळून आले. संपूर्ण वाहिनीची पाहणी करून बिघाडाचे ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यानंतर आवश्यक तांत्रिक काम पूर्ण करून रात्री ३.३० वाजता तुटलेली विद्युत वाहिनी जोडण्यात आली. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच देवरुख शहरासह परिसरातील सुमारे २० ते २५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
वन्यप्राण्यांची भीती तरीही मोहीम फत्ते
मुसळधार पाऊस, घनदाट जंगल, काळोख आणि वन्यप्राण्यांची भीती अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणच्या जनमित्रांनी हे आव्हानात्मक काम पूर्ण केले. वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत अथक परिश्रम घेतले.
हे काम उपकार्यकारी अभियंता प्रशांत राणे आणि सहाय्यक अभियंता रविंद्र खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. मुख्य तंत्रज्ञ सुरेश बावधने, प्रधान तंत्रज्ञ नंददीप दोडकडे, रोहन थरवळ तसेच तंत्रज्ञ बाबू बोटके, सुप्रेश वेले, परेश खेडेकर, ओमकार लिंगायत, विक्रांत भोसले, अक्षय घाटकर, सूरज मुंडे, अभी कदम, यंत्रचालक अक्षय जोशी आणि वाहनचालक रवी मिरगळ यांनी दुरुस्तीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे रात्रीच्या वेळी खंडित झालेला वीजपुरवठा पहाटेपर्यंत पूर्ववत झाला आणि देवरुख परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

