(रत्नागिरी)
कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणारे अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांचे आज सकाळी आफ्रिकेतून भारतात सुखरूप आगमन झाले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
दोन्ही खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीनंतर रत्नागिरीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे. सायंकाळी ६ वाजता साळवी स्टॉप येथे नागरिक मोठ्या संख्येने जमणार आहेत.
यानंतर साळवी स्टॉप ते मारुती मंदिर अशी भव्य स्वागत फेरी काढण्यात येणार आहे. या सोहळ्यात रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, विविध जिम, योगा ग्रुप्स, क्रीडा प्रेमी तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन, ॲथलेटिक्स असोसिएशन, बॅडमिंटन संघटना तसेच पत्रकार व शिक्षक प्रतिनिधीही या स्वागत सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम रत्नागिरीतील वाढत्या फिटनेस आणि क्रीडा संस्कृतीचे प्रतीक मानला जात असून शहरात या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, सायंकाळी ६ वाजता साळवी स्टॉप येथे उपस्थित राहून या स्वागत सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

