( खेड )
खेड तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा बोरज शेवरवाडी येथील शिक्षक श्री मंगेश झावरे यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या यशामुळे खेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गेल्या १४ वर्षांच्या सेवाकाळात श्री झावरे यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. तालुक्यातील पहिली प्रगत शाळा उभारणे, डिजिटल शाळेची संकल्पना राबवणे, ‘टेक्नो टीचर’ म्हणून नवे उपक्रम राबवणे, बदली प्रक्रियेत शिक्षकांना मार्गदर्शन करणे तसेच ‘मैत्री गुणवत्ता’ आणि ‘एकच ध्यास गुणवत्ता’ या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
हा पुरस्कार सोहळा २९ मार्च २०२६ रोजी पुणे येथील निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित ‘एज्युकेशन आयकॉन समिट २०२६’मध्ये पार पडला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते श्री झावरे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक, बोरज शेवरवाडी ग्रामस्थ, मुख्याध्यापक तसेच तालुक्यातील शिक्षकांनी श्री झावरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

