(चिपळूण / वार्ताहर)
दसपटीटी विभागातील श्री क्षेत्र टेरव (निम्मेगाव) येथील सुपुत्र राहुल विकासराव कदम यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे टेरव गावासह संपूर्ण दसपटी विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राहुल कदम यांनी कठोर परिश्रम, जिद्द, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीची आवश्यकता असते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे.
राहुल यांच्या या यशाबद्दल टेरव ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. कुलस्वामिनी आई भवानी वाघजाईच्या कृपाशीर्वादाने राहुल यांनी आगामी काळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करून टेरव गाव, चिपळूण तालुका आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
राहुल कदम यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

