( खेड )
तालुक्यातील मेटे येथे घडलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना खेड जिल्हा न्यायालयाने जामिनावर मुक्तता दिली आहे. गणि इस्माईल बोट, कादिर शमशुद्दीन घारे आणि अशरफ मोहम्मद बोट अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मेटे मोहल्ला येथील शफी अब्दुल्ला वरवटकर यांना आरोपींनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. २३ एप्रिल २०२६ रोजी खेड पोलिसांनी या तिघांना अटक केली होती. तक्रारीनुसार, आरोपींनी वरवटकर यांच्या छाती व बरगड्यांवर लाथा-बुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. ते खाली पडलेले असतानाही, तसेच त्यांच्या पत्नी व नातेवाईकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतानाही मारहाण सुरूच होती, असा आरोप करण्यात आला होता. या घटनेत वरवटकर यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आरोपींच्या वतीने ॲड. सुधीर शरद बुटाला यांनी खेड जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.
न्यायालयात सादर करण्यात आलेले कायदेशीर मुद्दे व वस्तुस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तिन्ही आरोपींना जामीन मंजूर केला. या निर्णयाकडे खेड तालुक्यातील कायदेविषयक वर्तुळाचे लक्ष लागले होते.

