(दापोली)
दापोली तालुक्यातील नारगोली परिसरात आज (गुरुवारी) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास खेड-दापोली मार्गावर एसटी बस आणि कार यांच्यात अपघात झाला. या कारमधून खेड येथील विधी महाविद्यालयात परीक्षेसाठी विद्यार्थी प्रवास करत होते.
प्राथमिक माहितीनुसार, खेडकडून दापोलीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसची आणि समोरून येणाऱ्या कारची धडक झाली. या अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. कारमधील विद्यार्थी तसेच एसटी बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. दोन्ही वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात होऊनही मोठी दुर्घटना टळल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

