( दापोली )
दापोली तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे असलेल्या आंजर्ले, हर्णे, मुरुड आणि लाडघर किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र या गर्दीचा गैरफायदा घेत काही हुल्लडबाज पर्यटकांकडून समुद्राच्या पाण्यातून बेदरकारपणे वाहन चालवले जात होते, ज्यामुळे नागरिक व इतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
किनारपट्टी परिसरात अशा नियमबाह्य वाहनचालनाामुळे अपघाताचा धोका वाढला होता. याबाबत वारंवार सूचना देऊनही आणि सूचनाफलक लावूनही काही पर्यटकांवर त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर दापोली पोलिसांनी कडक पावले उचलत मुरुड किनाऱ्याकडे जाणारा रस्ता बॅरिकेट्स लावून तात्पुरता बंद केला आहे. तसेच संपूर्ण किनारपट्टी भागात पोलिसांची करडी नजर ठेवण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दापोली पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दापोली पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्थानिक नागरिक व पर्यटन व्यवसायिकांकडून स्वागत करण्यात आले असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना कायदा व नियमांचे पालन करावे, स्वतःची व इतरांची सुरक्षितता धोक्यात आणू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

