(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील नाणीज दरडीवाडी येथील धनश्री दीपक दरडी यांनी सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती?’मध्ये आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हॉट सीटपर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या या सहभागामुळे नाणीजसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, कोकण विभागातून या कार्यक्रमाच्या हॉट सीटवर स्थान मिळवणाऱ्या धनश्री या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहेत.
धनश्री दरडी या जयगड येथील जिंदल विद्या मंदिरमध्ये संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गायनाची विशेष आवड असून त्या उत्तम गायिकाही आहेत. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या माधुरी दीक्षित यांच्यासमोर गायन सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांच्या सहभागाला विशेष रंगत आली.
धनश्री दरडी पुन्हा एकदा आज (मंगळवार, ३ नोव्हेंबर) रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या आगामी खेळाबाबत नाणीज परिसरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
धनश्री यांच्या या उल्लेखनीय सहभागामुळे नाणीज दरडीवाडी आणि कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून गावकरी, नातेवाईक, मित्रपरिवार आणि संगीतप्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी भागासाठी त्यांना सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


