( दापोली )
गुरु-शिष्य नातं हे श्रद्धेचं, विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. मात्र दाभोळमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने या नात्यालाच कलंक लावला आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे हे कृत्य असून, जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे.
दाभोळमधील भंडारवाडा येथे सायंकाळच्या सुमारास घडलेली ही घटना उघडकीस येताच परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. आरोपी शिक्षक किशोर येलवे (वय ४६, रा. आगरवागायणी) याने ‘घरी सोडतो’ या बहाण्याने मुलीला बाईकवर बसवलं आणि तिच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने या प्रकाराबाबत कुणालाही काही सांगू नको, अशी धमकीही दिली. घाबरलेली पीडित विद्यार्थिनी शेजाऱ्यांकडे धाव घेतली आणि पुढे संपूर्ण प्रकार तिच्या पालकांपर्यंत पोहोचला. पालकांनी तात्काळ दाभोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
या घटनेने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. शिक्षकाच्या रूपात समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तीकडून असा विकृत प्रकार उघड होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पोलिसांनी या प्रकरणी POSCO कायद्यानुसार आणि भारतीय दंड संहितेच्या नव्या कलमांतर्गत (BNS कलम ७४) गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करीत आहेत.
या प्रकारामुळे पालक वर्गात अस्वस्थता आहे. शिक्षकाचा असाच चेहरा समोर आल्यास मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो. अशा घटनेतील दोषींवर कठोरात कठोर कारवाई होऊन शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा अबाधित राहावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

