(खेड)
तालुक्यातील दाभिळनाका परिसरात दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातानंतर टाटा गाडीतील चालक व त्याच्या साथीदारांनी मारुती गाडीचालकाला मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार २९ मे २०२५ रोजी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास घडला.
या प्रकरणी मारुती गाडीचे चालक साईराज दिपक साळवी (वय २८, रा. श्रीसत गौरा कुंभारआळी, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी टाटा गाडीच्या अज्ञात चालकासह त्याच्या सोबत असलेल्या अन्य तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ३० मे रोजी दुपारी १.५३ वाजता गुन्हा रजिस्टर नंबर १०८/२०२५ अन्वये, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३च्या कलम २८१, १२५(२), ३५२ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कलम १८४ अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळवी हे आपल्या मारुती गाडीतून परशुराम मंदिराकडे जात असताना, दाभिळनाका लवेल येथे त्यांच्या गाडीला मागून येणाऱ्या टाटा (क्र. एम. एच. ०८ डब्लू १९९३) गाडीने भरधाव व निष्काळजीपणे ओव्हरटेक करताना धडक दिली. त्यामुळे त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले.
अपघातानंतर संबंधित टाटा वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, साळवी यांनी पाठलाग करून पिरलोटे येथे त्या वाहनाला थांबवले आणि अपघाताबाबत विचारणा केली असता, टाटा गाडीतील चालक व अन्य तिघांनी मिळून त्यांच्यावर हाताने मारहाण केली तसेच शिवीगाळ केली. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

