(रत्नागिरी)
रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यावरून सुरू असलेली फिनोलेक्ससह सर्व जड-अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
पावस-गोळप रोड परिसरातील फिनोलेक्स कंपनीची जड वाहने शहरातील मुख्य मार्गावरून वाहतूक करत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या अवजड वाहनांमुळे यापूर्वी अनेक लहान-मोठे अपघात घडले असून भविष्यातही गंभीर दुर्घटनांची शक्यता असल्याचा दावा मनसेने निवेदनात केला आहे.
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावर दिवसभर वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच शाळा, महाविद्यालये आणि महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांचा परिसर या मार्गावर असल्याने जड वाहनांची वाहतूक अधिक धोकादायक ठरत असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अवजड वाहनांची ये-जा तात्काळ बंद करावी, अशी आग्रही मागणी मनसेने केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला.
यावेळी संबंधित विषय गांभीर्याने घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, रोहन शेलार, मार्विक नारकर आणि मयुरेश पड्याळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

