(खेड)
खेड–दापोली मार्गावरील फुरूस येथे गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात होऊन एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुरूस येथील रहिवासी सचिन खामकर हे आपल्या मुलीसह ऍक्टिवा दुचाकीवरून खेडहून फुरूसकडे जात होते. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सचिन खामकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको केल्याची माहिती आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला असून एका संशयित वाहनाला ताब्यात घेतले आहे. अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे फुरूस परिसरात शोककळा पसरली आहे.

